
मुंबई : लॉकडाऊनमुळे रेल्वे प्रवासी सेवा बंद आहे. त्याचाच फायदा घेत मध्य रेल्वेने वीज यंत्रणा, रूळ, सिग्नल यंत्रणा, गटार, नाले अशा सर्व प्रकारच्या कामांचा सपाटा लावला आहे. ही कामे करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात येत आहेत.
हे वाचा : 1 मे पासून रुग्णालयांना हे नवीन नियम
मध्य रेल्वेने कर्जत रेल्वे मार्गाखाली पाणी साचत असल्याने, त्याची दुरुस्ती केली आहे. त्याचप्रमाणे दादर, भायखळा, घाटकोपर स्थानकांवरील छपरांची दुरुस्ती करण्यात आली आहे; तर छपरावरील पडणाऱ्या सांडपाण्याचीही विल्हेवाट लावण्यासाठी गटारांची साफसफाई, कुर्ला क्रॉसिंगवरील पाइपलाइनची दुरुस्ती, कळवा येथे पंप लाइन आणि भूमिगत नाल्यांची दुरुस्ती व 800 झाडांची छाटणीचे काम करण्यात आले आहे. आतापर्यंत 33 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची नालेसफाई केली आहे.
सिग्नल यंत्रणा तपासून संपूर्ण मुंबई विभागातील केबलची तपासणी करण्यात आली आहे. रेल्वे रुळांचे पॉइंट, सिग्नल युनिट बदलणे, सीएसएमटी येथे पॉवर पॅनेल व लाइटिंग पॅनेलमधील जोडण्या साफ करणे, बोगदा स्कॅनची कामेसुद्धा करण्यात आली आहेत. त्यामुळे लॉकडाऊननंतर रेल्वेची सेवा सुरू झाल्यास या कामासाठी वेगळा मेगाब्लॉक घेण्याची गरज पडणार नसल्याने रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुसाट होणार आहे.
खंडाळा घाटात स्टीलचा बोगदा
पावसाळ्यात खंडाळा घाटात रेल्वे मार्गावर दरडी कोसळत असतात. त्यामुळे अनेक वेळा रेल्वे दुर्घटना होण्याची शक्यता असते; तर रेल्वे सेवासुद्धा खोळंबतात. दरवर्षी येणाऱ्या अशा संकटावर कायमस्वरूपी उपाय म्हणून घाटात स्टीलचा बोगदा तयार करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वीच हे काम पूर्ण होणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील कामे प्रलंबित
रेल्वे मार्गावर पावसाळ्यात पाणी साचत असल्याने, त्यापूर्वीच या मार्गांवरील देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येतात. पश्चिम रेल्वे मार्गावरील काम मे महिन्यात सुरू होणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी विभागाने सांगितले आहे.
दरवर्षी 31 मे पर्यंत पावसाळ्यापूर्वीची देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण होत असतात. मात्र, यावेळी लॉकडाऊन काळातील वेळेचा सदुपयोग करत रेल्वे मार्गांवरील देखभाल-दुरुस्तीची कामे मार्गी लावली जात आहेत. नेहमीच्या वेळेपूर्वीच या वर्षी ही कामे पूर्ण होणार आहेत.
- ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.